संतोष भिसे
सांगली : कोरोनाची चाचणी घरच्या घरी करणारे रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किट बाजारात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली असून कोरोनाबाधितांची नेमकी संख्या निश्चित करणे आव्हानात्मक बनले आहे. यावर नियंत्रणासाठी किटच्या विक्रीचे सगळे तपशील नोंदवून ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने काढले आहेत.
सध्या बाजारात तीन ब्रॅण्डचे किट उपलब्ध आहेत. सरासरी किंमत २५० रुपये आहे. नाकातील स्रावाच्या नमुन्याद्वारे किटमधून कोरोनाची चाचणी घरच्या घरी करता येते. दुसऱ्या लाटेतच ते बाजारात आले होते. सध्या तिसऱ्या लाटेत त्याचा वापर वाढला आहे. लोक घरातच चाचणी करत आहेत. कोरोनाबाधित निष्पन्न झाले, तरी विलगीकरणाच्या भीतीपोटी आरोग्य विभागापासून लपवत आहेत. यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चनेच मंजुरी दिल्याने निर्बंध आणणेदेखील शक्य नाही.
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात ३२ किटची विक्री झाली. त्याद्वारे चाचणीनंतर अहवाल काय आला याची कोणतीही माहिती आरोग्य यंत्रणेला नाही. किट घेणाऱ्यांची माहितीही नाही. त्यामुळे सध्या दिसतात त्यापेक्षा कितीतरी जास्त कोरोनाबाधित असल्याची शक्यता आहे. कोरोना झाला, तरी लक्षणे आणि त्रास सौम्य असल्याने औषध दुकानांमधून औषधे घेऊन रुग्ण बिनधास्त समाजात वावरत आहेत.
आरोग्य यंत्रणेच्या डोळ्यांत धूळफेक
किटला आयसीएमआरनेच मान्यता दिल्याने खरेदीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता नाही, त्यामुळे लोक एकापेक्षा अधिक किट खरेदी करत आहेत. चाचणी सकारात्मक आली, तरी रुग्णालयांत औषधोपचार घेण्याचे टाळत आहेत. घरच्या घरी सुरू झालेल्या या प्रयोगशाळांनी आरोग्य यंत्रणेच्या डोळ्यांत धूळफेक सुरू केली आहे.
सेल्फ टेस्टिंग किटच्या विक्रीचे सारे तपशील नोंदवून ठेवण्याचे आदेश काढले आहेत. ग्राहकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, किती संच विकत घेतले आदी तपशील आवश्यक आहे. जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना तसे परिपत्रक जारी केले आहे. - विकास पाटील, निरीक्षक, औषध विभाग
घरच्या घरी किटद्वारे चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल ॲपवरून अपलोड करणे आवश्यक आहे. किट उत्पादक कंपन्यांनीही तशी सूचना केली आहे. यातून कोरोनाबाधितांची संख्या निश्चित करणे शक्य होईल. सध्यातरी विक्री व वापरावर काहीही नियंत्रण नाही. किटला आयसीएमआरनेच मान्यता दिली आहे. - डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी.