सांगली : जिल्ह्यात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या व त्यामुळे उपचाराची सोय करताना प्रशासनाची कसरत होत आहे. यासाठी आता जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कडक निर्बंधांमुळे येत्या आठवडाभरात रुग्णसंख्या कमी अथवा स्थिर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तरीही रुग्णांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात सोय करण्यात येणार आहे. जत तालुक्यातील माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात ४० बेड वाढविण्यात येत असून, यासह आरग (ता.मिरज), चिकुर्डे (ता.वाळवा), विटा, ढालगाव (ता.कवठेमहांकाळ) आणि वांगी (ता.कडेगाव) येथे ऑक्सिजनची सोय असलेले किमान १०० ते १२५ बेड वाढविण्यात येणार आहेत. येत्या आठवड्याभरात ही सुविधा सुरू होणार असल्याने रुग्णांची सोय होणार आहे.
जिल्ह्याला मागणी असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सध्या सुरू असून, राज्यातील विविध भागातून आणि बेल्लारी येथूनही ऑक्सिजन मिळत आहे, अशीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
चौकट
४५ व्हेंटिलेटर मिळाले
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ऑक्सिजन बेड्स वाढविण्यात येत असून, जिल्ह्यासाठी आता ४५ व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत.
यातील २५ व्हेंटिलेटर मिरज कोविड रुग्णालयात, तर २० व्हेंटिलेटर जिल्ह्यातील रुग्णालयांना देण्यात येणार आहेत.