सांगली : भाजपमधून फुटून राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या आणखी दोन नगरसेवकांना कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. त्यांच्या चाचणीचा अहवाल महापालिका प्रशासनाला मिळाला आहे. सात फुटीर नगरसेवकांपैकी चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.
महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीत भाजपची सात मते फुटली. त्यातील महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, नसिमा नाईक, अपर्णा कदम, विजय घाडगे या पाचजणांनी राष्ट्रवादी व काँग्रेसला मतदान केले. आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे तटस्थ राहिले. त्यामुळे महपौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी व उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले. बहुमतात असलेल्या भाजपला राष्ट्रवादीने कात्रजचा घाट दाखविला. निवडीपूर्वी दोन दिवस आधी फुटलेल्या सात सदस्यांपैकी दोघांना कोरोना झाला होता. त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. आता आणखी दोघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
या दोन नगरसेवकांचा अहवाल महापालिका प्रशासनाला मिळाला आहे. पण सध्या चौघेही कोरोनाग्रस्त शहरात नाहीत. त्यांचा आठ दिवसांपासून कुटुंबाशी संपर्कही झालेला नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण तो होऊ शकला नाही. त्यामुळे आता गुरुवारी त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जाणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.