वाळवा : वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी व गावातील सर्व डाॅक्टरांनी कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार केले. डाॅक्टरांनी व्यवस्थित नियोजन केल्याने रुग्णांना धीर मिळाला. त्यामुळे एवढ्या मोठ्या गावात कोरोना आटोक्यात येऊ शकला, अशी माहिती ग्रामपंचायत सरपंच डॉ. शुभांगी माळी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.
त्या म्हणाल्या, वाळवा येथे ४०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. त्यातील ५० जण होमआयसोलेशन उपचार घेत आहेत. ३० जण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर २० जण मृत झाले आहेत. ३०० कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामपंचायतीच्यावतीने सहा ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवले आहेत. ज्यांना गरज भासेल त्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जातात. ग्रामपंचायतीकडून होमआयसोलेशनमधील रुग्णांना कोरोना कीट दिले आहेत.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला एक लाख २० हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य पुरविले आहे.
यावेळी उपसरपंच पोपट अहिर, ग्रामपंचायत सदस्य इसाक वलांडकर, उमेश कानडे, संदेश कांबळे, आशा कदम, सुजाता पवार-मुसळे, मनीषा माळी, मानाजी सापकर, डॉ. अशोक माळी, प्रमोद यादव, प्रकाश गुईंगडे, उदय सावंत आदी उपस्थित होते.