इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आली. युवा नेते प्रतीक पाटील यांच्याहस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. श्रीमती माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. बी कांबळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख, कोविड विभागप्रमुख डॉ. राणोजी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील उपस्थित होते.
इस्लामपूर येथे २९ कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रत्यक्ष लस दिली नाही; मात्र लस कशी द्यायची? त्यानंतर अर्धा तास काय काळजी घ्यायची? ही सर्व माहिती ऑनलाईन कशी भरायची? याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रतीक पाटील यांनी या सर्व प्रक्रियेची माहिती घेत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली.
डॉ. नरसिंह देशमुख म्हणाले, पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स यांना ही लस दिली जाणार आहे; तर दुसऱ्या टप्यात पोलीस, भारतीय जवान, प्रशासनातील कर्मचारी व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षे वयोगटापुढील व इतर आजार असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली.
फोटो ओळी- ०८०१२०२१-आयएसएलएम-लसीकरण न्यूज
फोटो ओळ : इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस देण्याच्या प्रात्यक्षिकाचा प्रारंभ प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. श्रीमती माने, नागेश पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. वाय. बी. कांबळे, डॉ. नरसिंह देशमुख उपस्थित होते.