इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी वाळवा तालुक्यात अवघ्या २६ दिवसांत कोरोना लसीकरणाचे काम ८६ टक्के झाले आहे. जिल्ह्यात हे काम सर्वोत्कृष्ट आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले. याचवेळी त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्राम दक्षता समित्या सक्रिय करण्यात येत आहेत. कोविड नियमावलीचा भंग करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.
इस्लामपुर येथील पंचायत समितीच्या सभागृहात डुडी यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, प्रांताधिकारी विजय देशमुख, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, डॉ. साकेत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डुडी म्हणाले, शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे, नागरिक सहकार्य करत नाहीत. अशावेळी आरोग्य यंत्रणेचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. ग्राम दक्षता समित्यांनी कोरोना बाधित रुग्णांवर कठोर लक्ष ठेवावे. ते बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बाहेर फिरताना आढळून आल्यास गुन्हे दाखल करा. जिथे बाधित रुग्ण असेल, तो परिसर कंटेन्मेंट झोन करून सील करा. लोकसंख्येची घनता जास्त असल्याने ग्रामीण भागात प्रादुर्भाव मोठा आहे. लोकांना फिरण्यापासून रोखायला हवे. येत्या १५-२० दिवसांत कोरोनाची संसर्ग साखळी तुटली पाहिजे.
ते म्हणाले, ३० एप्रिलपूर्वी पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. १ मे नंतर लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे दुसरा डोस देण्याचे नियोजन करत आहोत. प्रत्येक दिवशी ५० हजार डोस देण्याची क्षमता जिल्ह्यात आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.
गुडेवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. संपूर्ण कुटुंबच बाधित होत असल्याचे समोर येत आहे. गल्ली-गल्लीत ३०-४० रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणा आणि ग्राम दक्षता समित्यांनी रुग्णांना भीती घालण्यापेक्षा वाईट काय आहे, हे सांगावे. संक्रमित रुग्ण ऐकत नसतील तर त्यांना कम्युनिटी केंद्रात टाका. पिंगळे म्हणाले, लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाईटपणा घेण्याची तयारी ठेवा. पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी सहकार्य करावे. शशिकांत शिंदे यांनी कोरोना संदर्भातील कामाची माहिती दिली.
जिल्हा परिषद सदस्य संजीवकुमार पाटील, अर्थ सभापती जगन्नाथ माळी, तहसीलदार रवींद्र सबनीस, दीक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.