पलूस : शासनाला जिल्ह्यातील ज्या खासगी रुग्णालयांनी कोरोना लसीकरणासाठी ऐन गरजेच्या काळात तयारी दाखवली, त्यांना शासनाने आता वाऱ्यावर सोडले आहे. या रुग्णालयांना आता कोरोनाची लस सरळ कंपनींकडून घेण्याचे आदेश आले आहेत.
कोरोनाचे संक्रमण पलूस तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र पसरत होते. त्यावेळेत कोरोना प्रतिबंधित लस सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडून उपलब्ध झाली. ही लस घेण्यासाठी लोकांच्यात म्हणावे तेवढे प्रबोधन नव्हते. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी सरकारी आरोग्य केंद्रात जात नव्हते. म्हणून शासनाने त्यांच्याकडे असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य केंद्र ज्या ज्या खासगी रुग्णालय दवाखान्यात आहे, अशा २७ खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणाची विनंती केली. त्यातील २५ रुग्णालयांनी होकार दिला.
त्यावेळी तेथील डॉक्टरांनी आपल्या आरोग्याची तमा न बाळगता तयारी दर्शवली. यातून त्यांना केवळ नाममात्र पैसे राहत असतानाही केवळ समाजकार्य म्हणून त्यांनी हा शिवधनुष्य पेलला. यातून पुढे कोरोना लसीबाबत सामान्य जनतेत जागृती झाली आणि शासकीय यंत्रणेवरील ताण वाढू लागला; पण नेमक्या याच वेळी या खासगी रुग्णालयांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली.
कोट
सर्व डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत शासनाला तशी मागणी करावी, हा पूर्णपणे केंद्र शासनाच्या अखत्यारितील विषय आहे. - डॉ मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी
कोट
शासनाच्या अडचणीच्या काळात आम्ही धोका पत्करून लसीकरण केले. हे केवळ सामाजिक कार्य म्हणून तरी शासनाने आमचा विचार करून लस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळावी.
- डॉ. सतीश गोसावी, इस्लामपूर
कोट
जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला लसीकरण करण्यासाठी शासकीय नियमानुसार लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करून या सामाजिक कार्यात आमचा सहभाग करून घ्यावा. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आहे.
- डॉ. संतोष कुल्लोळी, सांगली