लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शिराळा येथील ‘आयसेरा बायोलॉजिकल’ या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधण्याचे आव्हान स्वीकारले आहे. ड्रग कंट्रोल आॅफ इंडियाने या लसीची निर्मिती आणि चाचण्यांसाठी हिरवा कंदील दर्शविला आहे. प्रतिपिंड अर्थात अॅन्टीबॉडीज तंत्र त्यासाठी वापरले जाईल. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यूचे प्रमाण वाढले, तर अपवादात्मक परिस्थितीत नियमांच्या अधीन राहून अगदी ७-८ महिन्यांत लस तयार करता येईल, असा विश्वास कंपनीचे संचालक प्रताप देशमुख व दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केला.गेल्या काही दिवसांत चीनमध्ये प्रतिजैविकाच्या वापराने मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. त्याचाच वापर ‘आयसेरा’मध्ये केला जाईल. संचालक देशमुख व कुलकर्णी यांनी दावा केला की, कोरोनावर भारतीय तंत्रज्ञानाने बनविलेली प्रतिजैविके अत्यंत कमी वेळेत परिणामकारक ठरतील. त्यांना सव्वाशे वर्षांचा इतिहास असल्याने वयस्कर व कमी प्रतिकारक्षमतेच्या रुग्णांनाही ती जीवनदायी ठरतील. या औषधाने सहज बरे होऊ शकतील.