इस्लामपूर : कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र सरकारमार्फत मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. या लसीकरणासाठी केंद्र शासनाने प्रकाश हॉस्पिटलची निवड केली आहे. त्यासाठी कोव्हिशिल्ड ही लस केंद्रामार्फत २५० रुपयांमध्ये उपलब्ध केली आहे. मात्र, वाळवा, शिराळा आणि मिरज पश्चिम भागातील ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला प्रकाश हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती संस्थापक - नगराध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, वरील तिन्ही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या मोठी होती. त्यामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक ताण पडला होता. अनेक कुटुंबांची मानसिक आणि आर्थिक स्तरावर मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया किंवा आजारपणावर उपचार करणे शक्य झालेले नाही. हा विचार करून आरोग्य सेवेचा लाभ सामान्य जनतेला मिळावा, या हेतूने हे लसीकरण मोफत केले जाणार आहे. तसेच ४९९ रुपयांत कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था केली आहे.
पाटील म्हणाले, या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रकाश हॉस्पिटलमार्फत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील ११३ गावांमधील ११ हजार कुटुंबांसाठी प्रकाश कुटुंब दत्तक आरोग्य योजना सुरू करत आहोत. या योजनेत केंद्र सरकारच्या विविध विमा योजनांतर्गत रुग्णांना लाभ दिला जाणार आहे. एका कुटुंबातील चार व्यक्ती या योजनेमध्ये समाविष्ट असतील. या योजनेची नोंदणी प्रकाश हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. ही योजना ३ वर्षांसाठी राहणार आहे. या योजनेत औषध आणि चाचण्या यांचा खर्च वगळता इतर सर्व सेवा मोफत दिल्या जाणार आहेत.
महिला दिनानिमित्त ८ मार्चपासून तालुक्यातील महिलांसाठी ३१ मार्चपर्यंत मोफत आरोग्यसेवा दिली जाणार आहे. कोरोना लसीकरणासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पारपत्र यापैकी एक पुरावा देऊन नागरिकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय पाटील, डॉ. प्रदीप कुलकर्णी, धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, डॉ. अभिमन्यू पाटील, डॉ. धैर्यशील पाटील, संदीप सावंत उपस्थित होते.