सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न करून ठाणे, धुळे, वर्धा, मुंबई महानगरपालिका, पीएम केअर, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू, टाटा ट्रस्ट आदि विविध ठिकाणी सातत्याने संपर्क व पाठपुरावा करून सांगली जिल्ह्यासाठी ७४ व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. या व्हेंटिलेटरचे जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी कोविड हॉस्पीटलना वाटप करण्यात आले असून ते कार्यान्वित करण्यात येत आहेत.
संपूर्ण देशभर व सांगली जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाभर दौरा करून शहरी व ग्रामीण भागात रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेऊन शहरी भागातील रूग्णांबरोबरच ग्रामीण भागातील रूग्णांनाही दिलासा मिळण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयांबरोबरच खाजगी कोविड हॉस्पीटलना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासित केले होते.ग्रामीण भागातील ज्या रूग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, अशा रूग्णांना तालुकास्तरावरील शासकीय व खाजगी कोविड हॉस्पीटलमध्ये व्हेंटिलेटर बेडच्या कमतरतेमुळे सांगली, मिरज च्या ठिकाणी यावे लागत होते. अशावेळी दूरच्या ठिकाणाहून येणाऱ्या रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
आता महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय व खाजगी कोविड रूग्णालयाबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, खाजगी कोविड हॉस्पीटल यांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे.ज्या रूग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासते असे रूग्ण या सुविधेपासून वंचित राहू नयेत यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली जिल्ह्यासाठी शल्य चिकित्सक ठाणे व धुळे यांच्याकडून प्रत्येकी १० तर वर्धा यांच्याकडून १५ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. महानगरपालिका मुंबई यांच्याकडून १०, पीएम केअर मधून २५, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू यांच्याकडून १ असे ७१ तर टाटा ट्रस्टकडून उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर साठी १ असे एकूण ७४ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत.
व्हेंटिलेटर या ठिकाणी होणार कार्यान्वीत व्हेंटिलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे ६, विवेकानंद हॉस्पीटल १, श्रीसेवा हॉस्पीटल आटपाडी २, प्रकाश मेमोरिअल क्लिनीक इस्लामपूर २, उमा अरळी हॉस्पीटल जत २, श्रीसेवा हॉस्पीटल आटपाडी ४, उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ ३, मेहत्रे हॉस्पीटल कवठेमहांकाळ २, उपजिल्हा रूग्णालय शिराळा ४, श्री हॉस्पीटल विटा २, ओम श्री हॉस्पीटल विटा २, सदगुरू हॉस्पीटल विटा १, मयुरेश्वर हॉस्पीटल जत २, सांगलुरकर हॉस्पीटल इस्लामपूर २, कोविड सेंटर क्रिडा संकुल मिरज ५, दुधणकर हॉस्पीटल कुपवाड १, उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर ३, ग्रामीण रूग्णालय विटा ३, ग्रामीण रूग्णालय जत २, भारती हॉस्पीटल ५, घाडगे हॉस्पीटल ५, कुल्लोळी हॉस्पीटल ५, विवेकानंद हास्पीटल ३, वानलेस हॉस्पीटल मिरज ४ 000000