विकास शहाशिराळा- बिऊर (ता. शिराळा) येथील वर्षाराणी प्रमोद दशवंत यांनी पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्या फिरते दूध संकलन केंद्र चालवतात. स्वत: महिंद्रा पीक अप गाडी चालवत वाडी- वस्तीवर जाऊन दूध गोळा करतात. चूल आणि मूल ही परंपरागत वाट सोडून त्यांन आत्मसन्माचा'तो'हम रस्ता निवडला आहे. स्वत: चे फिरते दूध संकलन केंद्र चालवत त्यांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास सुरू आहे.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वर्षाराणी याचे माहेर शित्तूर वारूण (ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर) असून सासू जयश्री दशवंत घरची सर्व जबाबदारी पार पाडतात.तर सासरे सदाशिव दशवंत शेती सांभाळत दूध व्यवसायात मदत करतात. पती प्रमोद हे संकलित दूध मुख्य संघापर्यंत पोहचवतात. घरचा फुल्ल पाठिंबा असल्यानेच लोक काय म्हणतील, या चौकटीत त्या अडकल्या नाहीत.
जेमतेम नववीपर्यंत शिक्षण घेता आले. लग्नानंतर मात्र त्यांनी रितसर वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन नव्या इनिंग ला सुरूवात केली. मुलींनी धाडस दाखवले तर त्यांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळेतेच.असे त्या आवर्जून सांगतात. वर्षाराणी यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो आणि रात्री बारा वाजता मावळतो. सकाळी सातला घराबाहेर पडतात. दुपारी एक वाजेपर्यंत आणि नंतर सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत त्या दूध संकलन करतात.
दूध व्यवसायात वेळेचे गणित म्हत्वाचे असल्याचे त्या सांगतात. सकाळी आणि रात्री मिळून एकूण १३० ठिकाणी थांबून दूध संकलन करावे लागते. त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत पोहचावे लागते. वेळेच्या अगोदर किंवा खूपच उशीराने जाणे, हे नुकसान कारक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे वेळेचे काटेकोर नियोजन त्या करतात. कोणत्या थांब्यावर किती मिनिटे थांबायचे, हे ठरलेलं आहे. त्या वेळेत दूध संकलन करणे ,त्याची नोंदी घेणे. कोणाला पशुखाद्य हवे असेल, तर त्यांना ते देणे. कुणाच्या बिलाच्या संबंधित तक्रारी असतील तर त्या सोडवणे. हे काम दूध संकलन करतच चालू असते.ज्यावेळी वर्षाराणी यांनी सहा वर्षापूर्वी दूध व्यवसाय सुरुवात केली. तेव्हा त्यांचे दूध संकलन फक्त अडीशे लिटर होते. आज त्या दररोज जवळजवळ दोन हजार लिटर दुधाचे संकलन करतात. सुरुवातीला काही दिवस ड्रायव्हर ठेवून पाहिले. मात्र या व्यवसायामध्ये वेळेचे गणित आणि उत्पादकांच्या समस्या तात्काळ सोडवणे आवश्यक असते. उत्पादकांच्या समस्या समजून येत नसत.त्याचा परिणाम व्यावसायावर व्हायचा.त्यामुळे त्यांनी स्वतःहून गाडीचे स्टेरिंग हाती घेतली. आज त्यांनी सक्षम पणे एकटीने हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने उभा केला आहे. याबद्दल त्यांच्या घरच्यांना वर्षाराणी यांचे विशेष कौतुक आहे.
दुधावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा मानस
येत्या काळात आपण संकलित केलेल्या दुधावर प्रक्रिया करण्याचा छोटासा प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यातून स्थानिक लोकांना काही प्रमाणात रोजगार मिळेल आणि उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर देणे शक्य होईल . शिवाय आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला फायदा होऊ शकतो.वर्षाराणी प्रमोद दसवंत, बिऊर (ता. शिराळा).