सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रूग्ण संख्या पाहता बेड ची सुविधा असणारी खाजगी हॉस्पीटल कोविड-19 विषाणूबाधित रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून घेण्यात आली आहेत. या हॉस्पीटलमध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखा तपासणी अधिकारी व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे.
खाजगी हॉस्पीटलमध्ये कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी बेड तात्काळ उपलब्ध होण्यासाठी व शासन निर्णयानुसार योग्य कार्यवाही होण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली, दुधनकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली व मेहता हॉस्पिटल सांगली या रूग्णालयांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, भारती हॉस्पीटल सांगली, कुल्लोळी हॉस्पिटल सांगली व मिरज चेस्ट सेंटर मिरज साठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) विवेक आगवणे, शासकीय मेडीकल कॉलेज कोविड हॉस्पिटल मिरज, वानलेस हॉस्पीटल, सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व वानलेस हॉस्पिटल प्रायव्हेट साठी तहसिलदार (संगायो) किशोर घाटगे, श्वास हॉस्पीटल, सिव्हील हॉस्पीटल सांगली, विवेकानंद मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल बामणोली कुपवाड मिरज व अपेक्स केअर हॉस्पीटल साठी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे (भूसंपादन) यांची पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
या अधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त काम करावयाचे असून त्यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना घेऊन रूग्णांचा प्रवेश व डिस्चार्ज याबाबतीत पर्यवेक्षण करणे, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अद्ययावत करून घेणे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक रूग्णांना फायदा करून देणे तसेच रूग्णालयांचे प्रशासन व इतर शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवणे व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामकाज करावयाचे आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.