सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील व्यापाराच्या निमित्ताने होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता सर्व दुकाने टप्प्याटप्प्याने सकाळी व दुपारी सुरू राहतील अशा तऱ्हेने दुकानांच्या वेळा ठरवाव्यात.याकरीता तात्काळ व्यापारी असोसिएशनची बैठक आयोजित करून याबाबतचे निर्देश द्यावेत व तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महानगरपालिका व सर्व नगरपरिषद प्रशासनास दिले आहेत.बाजारपेठांमधील वाहनांची गर्दी कमी करा - जिल्हाधिकारी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शहरी भागातील प्रमुख बाजारपेठांमधील व अन्य ठिकाणी प्रवासी वाहनांमुळे होणारी गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक ते पर्यायी मार्ग किंवा दिवसाआड वाहतूक किंवा वेळेत बदल किंवा अन्य योग्य त्या उपाययोजना करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलीस विभागास दिले आहेत.