कुपवाड : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील उद्योग आता उद्योजकांनी तीन शिफ्टमध्ये सुरू ठेवावेत. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ही विभागणी गरजेची आहे. उद्योजकांनी एकाच शिफ्टमध्ये जास्त प्रमाणात कामगार उद्योगामध्ये बोलावून घेणे टाळावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबरसह इतर औद्योगिक संघटनांच्या बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी बोलत होते.
बैठकीस जिल्हा पोलीसप्रमुख सुहैल शर्मा, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे, आयुक्त नितीन कापडणीस, सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उपाध्यक्ष विनोद पाटील, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, शिवाजी पाटील, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, गणेश निकम उपस्थित होते.चौधरी म्हणाले, उद्योगामध्ये जे कामगार आहेत. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगा. त्यांना तासा-तासाला साबणाने हात धुण्यासाठी प्रवृत्त करा. ज्यांना ताप, खोकला, सर्दी असे आजार आहेत, त्यांना सुटी द्या. त्यामुळे इतर कामगार आजारी पडणार नाहीत.
उद्योगातील मशिनरीची स्वच्छता ठेवावी. बाहेरून येणाऱ्या कामगारांना कामावर घेऊ नका. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना मज्जाव करा. परराज्यातून येत असलेल्या कामगारांची तपासणी करून नंतरच त्यांना कामावर घ्यावे, अशा सूचना जिल्हा पोलीसप्रमुख शर्मा यांनी दिल्या.