सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलांबाबत मोठ्या ा्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरीकांच्या तक्रारी पहाता जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा टोल फ्री नंबर 1077 आहे. या कक्षासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यामध्ये सदयस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी खाजगी व शासकीय रूग्णालेय अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत. पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण हे दोन्ही रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल करुन घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, तक्रार निवारण कक्ष 24 तास कार्यान्वीत असून 24 तासांसाठी कर्मचाऱ्यांंच्या तीन शिफ्टमध्ये नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. सबंधित तक्रार निवारण कक्षाकडील टोल फ्री नंबरवर प्राप्त होणा-या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन संबधित हॉस्पीटल प्रशासन व नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय / पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांशी / लेखा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये 04 तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.