सांगली : जिल्ह्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी करताच, व्यापारी संघटनांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काही संघटनांनी जनता कर्फ्यू नको, संपूर्ण लॉकडाऊन करा, अशी भूमिका घेतली, तर काहींनी जनता कर्फ्यूला विरोध केला आहे. सामाजिक संघटनांनी, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन केले आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन मंगळवारी केले. त्यांच्या आवाहनानंतर सांगली-मिरजेतील व्यापारी संघटनांतून मत-मतांतरे समोर आली.व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी, जनता कर्फ्यू नको, संपूर्ण लॉकडाऊन करा, अशी भूमिका घेतली. शहा म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. बाजारपेठेतही नियम पायदळी तुडविले जात आहेत.
जनता कर्फ्यू प्रभावी राहणार नाही. उपनगरांतील छोटी दुकाने सुरू राहतील. रस्त्यांवर नागरिकांची गर्दी कायम राहील. त्यातून कोरोनाची साखळी तुटणार नाही. पालकमंत्र्यांनी केंद्र शासनाची परवानगी घेऊन १४ दिवसांचा लॉकडाऊन करावा, अशी मागणी केली.तसेच मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे यांनी जनता कर्फ्यूला विरोध असल्याचे सांगितले. मिरजेतील व्यापारी आपली दुकाने सुरु ठेवतील. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेऊन जनता कर्फ्यू जाहीर केला असता, तर बरे झाले असते, असे सांगितले.मिरजेतील सर्वपक्षीय नेते, नगरसेवकांची बैठक उपअधीक्षक संदीपसिंह गील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले, जनता कर्फ्यूबाबत एकवाक्यता होणार नाही.
त्यासाठी नागरिकांनीच जबाबदारीने वागण्याची गरज आहे. त्यातच खरा शहाणपणा असल्याचे सांगितले. दरम्यान, मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला विरोध केला आहे. यासंदर्भात बुधवारी बैठक घेऊन ते निर्णय घेणार आहेत.