सांगली : कोरोना रूग्णांना ॲडमिट करण्यासाठी रूग्णालयांना डिपॉझीट मागता येणार नाही. तसेच डिपॉझीटसाठी रूग्णास ॲडमिशन नाकारता येणार नाही, असे आढळल्यास संबंधित रूग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रूग्णालयांबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहीत करण्यात येत आहेत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गरजू रूग्णांना बेडस् उपलब्ध होण्यासाठी कोविड पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या रूग्णांपैकी ज्या रूग्णांना ॲडमिट करण्याची आवश्यकता आहे, अशा रूग्णांनाच ॲडमिट करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाची लक्षणे दिसल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. वेळेत औषधोपचार सुरू झाल्यास कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्हाधिकारी म्हणाले, गंभीर रूग्णांना ॲडमिट करण्यासाठी प्रत्येक रूग्णालयांमध्ये एक ते दोन बेडस् राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक रूग्णालयासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
रूग्ण ॲडमिट करून घेण्याबाबत व इतर काही अडचण किंवा तक्रार असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षासी किंवा संबंधित रूग्णालयामधील प्रशासकीय अधिकारी किंवा ऑडीट टीमकडे संपर्क साधून तक्रार करावी.
कोरोना रूग्णांवर उपचारासाठी आणखी काही रूग्णालये अधिग्रहित करण्याबरोबरच नवीन हॉस्पीटल तयार करण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत. काही रूग्णालयांमध्ये अतिरिक्त बेडस् तयार करण्याचे प्रयत्नही चालू आहेत.कोरोना रूग्ण लवकर उपचाराखाली येण्यासाठी टेस्टींगची संख्या वाढविण्यात येत आहे. यासाठी रॅपीड ॲन्टीजन टेस्ट करण्यासाठी 40 हजार किटची मागणी केली असून यातील 20 हजार किट एक ते दोन दिवसात उपलब्ध होतील, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शासकीय लॅबमध्ये प्रतिदिन 1 हजार सॅम्पल्स घेण्याचे नियोजन केले आहे.
टेस्टींग वाढविण्यासाठी काही खाजगी पॅथॉलॉजीस्टनीही त्यांच्याबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत रॅपीड ॲन्टीजन टेस्ट किट खरेदी करून शासकीय दरामध्ये टेस्ट करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येबरोबरच आवश्यक सर्व गोष्टींची क्षमता वृध्दी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. आरटीपीसीआर तपासणीनंतर संबंधित व्यक्तीला तो पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्हचा रिपोर्ट मॅन्युअली द्यावा लागत होता. आता आरटीपीसीआर मशीनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप केले असून त्यामुळे संबंधित व्यक्तीला सर्वसाधारण 12 तासानंतर मेसेज जातो व लिंकही प्राप्त होते.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत सविस्तर माहिती देवून करण्यात येत असलेल्या उपयायोजनांबाबत माहिती दिली.