सांगली : कोरोनाने ऐन लग्नसराईत विघ्ने निर्माण केली आहेत. बाजारपेठेत खूपच मोठी आर्थिक उलाढाल करणारा लग्नांचा हंगाम यंदा सुनासुना ठरला आहे. आचारी, बँडवाले, मंडप व्यावसायिक, पुरोहित या साऱ्यांचेच कोरोनाने दिवाळे काढले आहे.दिवाळीपासून सुरु होणारी लग्नसराई जानेवारीत थंडावली होती. एप्रिलपासून ती पुन्हा सुरु होणार होती, तितक्यात कोरोनाचे तांडव सुरु झाले. सोहळ्यांवर निर्बंध आल्याने उलाढाल थांबली आहे.सांगली बाजारपेठेतील तोरणांचे विक्रेते हारुण मणेर म्हणाले, ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिवसभर बसून राहतो. चौकशीसाठीही ग्राहक फिरकत नाहीत. माझ्यासारखीच अवस्था पेठेतील अन्य व्यावसायिकांचीही आहे. माझ्या स्वत:च्या परिवारातले दोन विवाहसोहळे संकटात आलेत. एक विवाहसोहळा स्थगित केला, तर दुसरा पाच-दहा पाहुण्यांच्या उपस्थितीत करणार आहे.लग्न सोहळ्याच्या निमित्ताने फुलांची मोठी विक्री होते. कोरोनाच्या धास्तीने सोहळे रद्द होऊन फुलांच्या उलाढालीला मोठा झटका बसला आहे. विशेषत: गुलाब उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
मिरजेच्या फूलबाजारात अथणी, कागवाड, तासगाव, शिरोळ इत्यादी परिसरात खूपच मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते, पण पंधरवड्यापासून त्यांना ग्राहकच नाही अशी माहिती फुल व्यवसायिक सतिश कोरे यांनी दिली. निशिगंधाची विक्रीही पूर्णत: थंडावल्याने मिरज तालुक्यातील उत्पादक नुकसानीत गेले आहेत.