शीतल पाटील सांगली : जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस हे सधन तालुके सध्या कोरोनाचा हॉट स्पॉट बनले आहेत. महापालिका क्षेत्रापाठोपाठ या तीन तालुक्यांत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दुष्काळी आटपाडी, जत आणि डोंगरी शिराळा तालुक्यात रुग्णांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे.जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढले होते. प्रामुख्याने पुणे, मुंबई, दिल्ली या शहरांतून गावी परतलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. शिराळा, आटपाडी, खानापूर या तालुक्यात रुग्णसंख्या अधिक होती. अनलॉकनंतर महापालिका क्षेत्रात मात्र कोरोनाचा कहर सुरू झाला.जूनअखेरपर्यंत महापालिका क्षेत्रात केवळ २४ कोरोनाचे रुग्ण होते. पण जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात साडेतेरा हजार रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील सधन तालुक्यांतही कोरोनाचा संसर्ग वाढला. विशेषत: वाळवा, मिरज आणि पलूस या तीन तालुक्यांत दररोज ५० ते १०० रुग्ण सापडू लागले.
महापालिका क्षेत्रात सध्या १३,५२३, वाळवा तालुक्यात ३,८३३, तर मिरज तालुक्यात ३,४६४ रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल तासगाव तालुक्यात २,१५६ व पलूसमध्ये १,९७७ रुग्ण सापडले आहेत.पालकमंत्र्यांचा तालुका पहिल्या क्रमांकावरमहापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यातच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या तालुक्यात संसर्ग दिवसेंदिवस वाढतच जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत तर दररोज ९० ते १०० रुग्ण आढळून येत आहेत.