सांगली : "आता कसं वाटतंय आजी .... काही काळजी करू नका... दोन - तीन दिवसात बर्या व्हाल..." अशा शब्दात पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आजीला धीर दिला.पालकमंत्री पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डला भेट दिली. त्यांनी पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली व त्यांना मानसिक आधार दिला.दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी रुग्णालयाच्या विभागप्रमुखांसह बैठकही घेतली व रुग्णालयातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.
लवकरच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू. इथला प्रत्येक रुग्ण या रोगावर मात करणार व माझे सांगलीकर या संकटाला हरवणार याची मला खात्री आहे असा विश्वासही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.