सांगली : रक्तदान, प्लाझ्मा दान, डॉक्टर आपल्या दारी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोविड काळात सामान्य लोकांना मदतीचा हात देणाऱ्या भारतीय जैन संघटनेमार्फत आता संपूर्ण महाराष्ट्रात 'मिशन - कोविड कनेक्ट’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे. त्याची सुरुवात सांगलीमधून होणार आहे, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील यांनी दिली.पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये कोरोनाने कहर केला आहे. सांगली जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोरोना मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. शासन व प्रशासन त्यांच्यास्तरावर साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तरीही कोविड केअर सेंटर्स व कोविड हॉस्पिटल्सची कमतरता भासत आहे. कोरोनाविषयीचे गैरसमज व अवास्तव भीतीसुध्दा वाढतच आहे.
आपल्या सांगली जिल्हयातील जनमान्य व्यक्तींनी एकत्र येऊन एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था हे गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत.
आता महाराष्ट्रात 'मिशन-कोविड कनेक्ट’ हा उपक्रम त्यांनी आखला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सांगलीतील राजमती भवन, नेमिनाथनगर येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. शांतिलाल मुथ्था यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चोधरी, महापालिका आयुक्त नितिन कापडणीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी उपस्थिती राहणार आहेत.सुरेश पाटील म्हणाले, भारतीय जैन संघटनेमार्फत शैक्षणिक, आरोग्य, दुष्काळमुक्त अभियान आदी विषयांवर सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात प्लाझ्मा डोनर्स जीवनदान योजना, रक्तदान शिबिर, निराश्रितांना भोजन, डॉक्टर आपल्या दारी, मिशन झिरो असे प्रकल्प व उपक्रम राबविले. मिशन - कोविड कनेक्ट' या महत्वाकांक्षी प्रकल्पातून कोरोनाबाबत असलेली अवास्तव भीती व गैरसमज दुर करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
होम क्वारंटाईन असलेल्या बाधितांना योग्य मार्गदर्शन, समाजाच्या पुढाकाराने जिल्हयामध्ये कोविड केअर सेंटर्स निर्माण करणे, खासगी रूग्णालयांचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करणे, जिल्ह्यातील जास्तीत जास्त डॉक्टरांना कोविडशी लढताना तज्ज्ञ व अनुभवींकडून प्रशिक्षण देणे, यासारख्या गोष्टी केल्या जाणार आहेत.