सांगली : कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या ९९ हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या १३६ बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाने आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेश दिले आहेत.
शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत. त्या अनुषंगाने शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.
या पथकाकडे लेखा तपासणीसाठी आत्तापर्यंत ३७९ देयके प्राप्त झाली असून यापैकी तफावत असलेल्या १३६ देयकांमधील ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेशीत केले आहे. तर रूग्णालयांनी औषधाच्या व तपासणीच्या पावत्या सादर न केल्याने १९ लाख ८९ हजार ९९३ रूपयांची देयके आक्षेपाधीन ठेवली आहेत. लेखा तपासणी नंतर देयकांमध्ये अनियमतेबाबत विविध रूग्णालयांना एकूण ९९ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.तफावत आढळलेल्या विविध १३६ रूग्णालयांमध्ये भारती हॉस्पीटल ६, कुल्लोळी हॉस्पीटल २९, विवेकानंद हॉस्पीटल ५, सेवासदन १२, मिशन हॉस्पीटल २४, घाटगे हॉस्पीटल १०, मेहता हॉस्पीटल १२ व सिनर्जी हॉस्पीटल, सांगली यांना १ अशा एकूण ९९ रूग्णालयांना विविध प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्यांचा खुलासा समाधानकारक नाही आणि अतिरिक्त बिलाची रक्कम जी रूग्णालये रूग्णांना परत करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.लेखा तपासणी पथक देयकांच्या अनुषंगाने नर्सिंग, आयसोलेशन, आयसीयु चार्जेस, रूम रेंट, कन्सल्टेशन, विविध चाचण्या, ऑक्सीजन, औषधे आदिंच्या शुल्क आकारणीबाबत काटेकोरपणे तपासणी करीत आहे. लेखा तपासणी पथकास आत्तापर्यंत १ कोटी ७७ लाख १२ हजार ६४९ रूपयांची ३७९ देयके प्राप्त झाली असून यापैकी १३६ देयकांमध्ये तफावत आहे.
यामधील ७ लाख ९५ हजार ३६६ इतकी तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेशित केले असून यापैकी आत्तापर्यंत जादा बील आकारणी झालेल्या एका हॉस्पीटलने रूग्णास ४१ हजार ७९ रूपये रक्कम परत केली आहे तर अद्याप विविध रूग्णालयांनी रूग्णास परत करावयाची रक्कम ७ लाख ५४ हजार २८७ रूपये इतकी आहे.