सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर वाढत असतानाच, रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झाली. यात महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे, तर सांगली शहरातील नळभाग आणि कृष्णाघाट परिसर येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक ३४ नवे रुग्ण आढळले आहेत, तर दिवसभरात ८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधितांची गुरुवारी नोंद झाली. सांगलीतील नळभाग येथील ६८ वर्षीय वृध्दावर वॉन्लेस रुग्णालयात, तर कृष्णाघाट (सांगली) येथील ५९ वर्षीय व्यक्तीवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या ७२ झाली आहे.
महापालिका क्षेत्रात १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात सांगलीतील ६४, तर मिरजेतील ७० जणांचा समावेश आहे. यात वारणाली, विश्रामबाग, माधवनगर रोड, लाले प्लॉट, एसटी कॉलनी, विश्रामबाग, हनुमाननगर, मंगलमूर्ती कॉलनी, जवाहर चौक, वानलेसवाडी, खणभाग, कुंभारखण, गणेशनगर, मंगळवार पेठ, गंगानगर, शामरावनगर येथील रूग्णांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात १८१ अॅँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.मिरज तालुक्यात सर्वाधिक ३४ रूग्ण आढळून आले. सलगरे, कवठेपिरान, आरग या मोठ्या गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात भोसे येथे ९, बेडग ५, अंकली ७, आरगमध्ये ३, सलगरे, मौजे डिग्रजमध्ये प्रत्येकी दोन, गुंडेवाडी, कवठेपिरान, दुधगाव, वड्डी, कर्नाळ, हरिपूर येथे प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.पलूस तालुक्यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात खटाव येथील ६, सावंतपूर येथील ५, वसगडे, सुखवाडीत प्रत्येकी तीन, माळवाडीत दोन, तर अंंकलखोप येथील एकाचा समावेश आहे.जत तालुक्यात १६ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. यात जत येथील ११, बिळूर २, अंकलगी, उमराणी, पाच्छापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तासगाव तालुक्यात वंजारवाडी येथील १० आणि तासगाव शहरातील दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. वाळवा तालुक्यात इस्लामपूर शहरात ३, ताकारी, आष्टा, शिगाव येथे प्रत्येकी २, तर भडकंबे, कोरेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.