सांगली : खासगी रुग्णालयांतील कोरोनावरील उपचारासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले दर सामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत. त्यामुळे हे दर कमी करावेत, अशी मागणी महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांनी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे केली.राज्यमंत्री डॉ. कदम यांनी काँग्रेस नगरसेवकांची अस्मिता बंगला येथे बैठक घेतली. यावेळी आमदार मोहनराव कदम, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, प्रकाश मुळके, अमर निंबाळकर उपस्थित होते.साखळकर म्हणाले, महापालिका क्षेत्रात कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे. यावर मार्ग काढण्याची गरज आहे. अभिजित भोसले, मंगेश चव्हाण यांनी, प्रशासनाने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत, परंतु तेथे शासनाने ठरवून दिलेले दरही जास्त आहेत. त्यामुळे रुग्णांची बिले भरमसाट येत आहेत. शासनाने ठरवून दिलेले दर कमी करावेत. तसेच पीपीई कीटच्या दरावरही निर्बंध घालावेत. त्यामुळे सामान्य रुग्णांना आर्थिक भार सहन करणे शक्य होईल.
ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने महापालिका क्षेत्रात येत आहेत. ग्रामीण भागात व्हेंटिलेटर चालवू शकणारे तंत्रज्ञ कमी आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी सांगली, मिरजेत आणावे लागते. त्याचाही ताण महापालिकेवर पडत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. यावेळी नगरसेवक प्रकाश मुळके, संजय मेंढे, वर्षा निंबाळकर, मदिना बारुदवाले, आरती वळवडे, फिरोज पठाण उपस्थित होते.८२ व्या वर्षी कोरोनावर मात : कदमआमदार मोहनराव कदम यांनाही कोरोना झाला होता. पण त्यांनी कोरोनावर मात केली. मोहनराव कदम यांनी नगरसेवकांना धीर देत, मी ८२ व्या वर्षी कोरोनावर मात करून बरा झालो आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरू नका. स्वत:ची काळजी घेऊन जनतेला दिलासा देण्याचे काम करा, असा सल्लाही दिला.पालिका कोविड सेंटरला भेटविश्वजित कदम यांनी महापालिकेच्या आदिसागर कोविड सेंटरला भेट दिली. सात दिवसांत १२० बेडचे सेंटर उभारल्याबद्दल आयुक्त नितीन कापडणीस आणि यंत्रणेचे कौतुक केले. यावेळी व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे, वैभव वाघमारे, मयूर पाटील आदी उपस्थित होते.