सांगली : महापालिका क्षेत्रात मुंबई शहरातून आलेल्या पन्नास वर्षावरील 188 नागरिकांची कोरोना चाचणीला करण्यात येत आहे. आतापर्यंत ५० टक्के नागरिकांची चाचणी पूर्ण झाली असून त्याचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
दरम्यान, शंभर फुटी रस्त्यावरील कुदळे प्लॉटमधील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील दोघांचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला. कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विजयनगर येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. या रूग्णाचा मृत्यू झाला होता.
आजअखेर महापालिका क्षेत्रात बारा रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या एका रूग्णावर उपचार सुरू आहे. इतर रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रात मुंबईसह इतर शहर व परराज्यातून आलेल्या व्यक्तिंची संख्या मोठी आहे. शहरात आलेल्या पन्नास वर्षांवरील व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 188 व्यक्तींची यादी तयार केली आहे. त्यांच्या चाचणीला सुरूवात झाली असूम पन्नास टक्के नागरिकांचे स्वाब तपासले गेले आहेत. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
परराज्यातून आणिमुबंई, रायगडसह इतर हॉटस्पॉट जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. चौकट कोरोना, महापूराचा हिशोब देणार राज्य शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या उपाययोजना व साहित्य खरेदीसाठी सुमारे दीड कोटींचा निधी दिला आहे.
या निधीतून कोरोनाबाबतच्या उपाययोजना केल्या जात आहेत. या सर्व निधीचा हिशोब तयार केला जात आहे. हा हिशोब महासभेला सादर करणार आहोत. तसेच गतवर्षी महापूरावेळी आलेली मदत, महापालिकेने केलेला खर्चाचा लेखाजोखाही देणार आहोत, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.