सांगली : महापालिकेकडून कोरोना त्रिसूत्रीचे उल्लंघन करणाऱ्यांवर बुधवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सांगली व कुपवाडमधील १० खासगी आस्थापनांसह विनामास्क फिरणाऱ्या ४३ जणांकडून दंड वसूल करण्यात आला.शहरात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिकेने पथकेही नियुक्त केली आहेत.
सहायक आयुक्त सहदेव कावडे यांनी सांगलीत ४ वाणिज्य आस्थापनांवर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन आणि विनामास्कप्रकरणी कारवाई करीत ३४०० रुपयांचा दंड वसूल केला.
या कारवाईत स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, वैभव कुदळे, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, गणेश माळी, उत्कर्ष व्होवाळे आदींनी सहभाग घेतला; तर मिरजेत सहायक आयुक्त डी. एस. गायकवाड यांनी विनामास्क फिरणाऱ्या २० व्यक्तींकडून २५०० रुपये, तर सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या एका व्यक्तीस ५०० रुपये असे ३००० चा दंड वसूल केला आहे.
कुपवाडचे सहायक आयुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्या ६ व्यक्तींकडून ७०० रुपये दंड, तर सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या व मास्क न वापरल्याबद्दल ६ खासगी आस्थापनांकडून तीन हजार असा ३७०० रुपयांचा दंड वसूल केला.