मिरज : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने, उन्हाळी सुटीच्या हंगामासाठी केलेले रेल्वे तिकिटांचे आरक्षण रद्द करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
चार महिने अगोदर आरक्षित करण्यात आल्याने तिकिटे मे अखेर आरक्षित तिकिटे संपली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत देशातील विविध शहरांत व पुण्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने रेल्वेच्या आरक्षित तिकिटांची विक्री थंडावली आहे. रेल्वे प्रवास रद्द करून आगाऊ आरक्षित तिकिटे प्रवाशांकडून रद्द करण्यात येत आहेत.उन्हाळी सुटीत प्रवासासाठी रेल्वे प्रवासासाठी मोठी गर्दी होते. यावर्षीही मिरजेतून सुटणाऱ्या निजामुद्दीन, अजमेर, जोधपूर, तिरूपती, बेंगलोर, एर्नाकुलम, तिरूनेलवेल्ली, चंदीगड, नागपूर, अहमदाबाद या सर्वच दररोज व साप्ताहिक एक्स्प्रेस मे अखेर फुल्ल आहेत.
निजामुद्दीन, अजमेर, जोधपूर यासारख्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षायादी मोठी असल्याने तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी प्रवाशांची तिकीट खिडकीवर गर्दी होती. मात्र गेल्या आठवड्याभरात देशातील व राज्यातील विविध शहरात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने अनेकांनी सुटीतील प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा-निजामुद्दीन, बेंगलोर-अजमेर, बेंगलोर-जोधपूर या प्रिमियम दर्जाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रिमियम दराने दुप्पट ते चौपट पैसे मोजावे लागतात; मात्र रेल्वे तिकिटांचे आरक्षण रद्द होत असल्याने प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना जागा उपलब्ध होत आहे. कोरोना संकटामुळे अनेकांनी परदेशी सहल रद्द केल्याने देशाअंतर्गत प्रवासासाठी रेल्वेच्या आरक्षित तिकिटांना मोठी मागणी होती. मात्र गेल्या आठवड्याभरात तिकिटे रद्द करण्याचे प्रमाण वाढत आहे.