सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, नागरिकांतील सेरॉलॉजिकल सर्वेक्षणासाठी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचे पथक सांगलीत दाखल झाले आहे. या पथकाकडून कोरोना हॉटस्पॉटमधील नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या तपासणीतून किती लोकांना कोरोनाची लागण होऊन तो बरा झाला, याची माहिती मिळणार आहे.कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या राज्यातील पाच जिल्ह्यात राज्य शासनाकडून सेरॉलॉजिकल सर्वेक्षण केले जात आहे. यात सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत कोरोनाचा कहर सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर सेरॉलॉजिकल सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्वेक्षणासाठी आयसीएमआरची १२ पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत. त्यात महापालिका क्षेत्रात दोन, तर ग्रामीण भागात १० पथकांव्दारे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. महापालिका क्षेत्रात २२ जणांचे पथक कार्यरत असून, हनुमाननगर आणि अभयनगर आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात ही तपासणी करण्यात आली.मोठ्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाहून चारही बाजूतील घरातील ८० लोकांचे रक्ताचे नमुने या तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची तपासणी केली जाणार आहे. किती नागरिकांना कोरोनाची लागण होऊन ते बरे झाले, याची माहिती सर्वेक्षणातून हाती येणार आहे. रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले जाणार असून, त्याचा अहवाल शासन आणि महापालिका आयुक्तांकडे दिला जाणार आहे.या अहवालानंतर शासनाला पुढील धोरण निश्चित करण्यास मदत होणार आहे. या पथकामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. राजबाबू येवले, डॉ. अविनाश जाधव, आयसीएमआर, पुणेचे प्रमुख डॉ. ऋषिकेश आंदळकर,चेन्नईच्या प्रतिनिधी नम्रता हजारी, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिलिंद गेजगे, डॉ. प्रियांका सुरवसे-मेथे, साधना फडणीस, नितीन देसाई सहभागी झाले आहेत.