सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, एकाच दिवसात ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मिरज शहरातील २२ आणि आटपाडी तालुक्यातील १६ जणांचा समावेश आहे. मिरजेतील ७३ वर्षीय हॉटेलचालक आणि शिगाव (ता. वाळवा) येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, जिल्ह्यातील बळींची संख्या २५ झाली आहे.बुधवारी तब्बल ७५ जणांना कोरोनाचे निदान झाले होते. गुरूवारी मिरज शहरात २२ जणांना कोरोनाचे निदान होऊन शिवाजी रस्त्यावरील ७३ वर्षे वयाच्या हॉटेलचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी एका रुग्णालयातील परिचारिकेस कोरोनाची बाधा झाली होती. तिच्या संपर्कातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बुधवार पेठेतील पिग्मी एजंटाच्या कुटुंबातील आणखी तिघांना कोरोनाचे निदान झाले आहे. मंगळवार पेठ, लालनगर लेप्रसी कॉलनी, ब्राम्हणपुरी, पिरजादे प्लॉट, मेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थिनी, रेवणी गल्ली येथील दोघे अशा २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.सांगली शहरातही विश्रामबाग येथील ८५ वर्षीय महिला, टिंबर एरियातील ५५ वर्षीय पुरूष, खणभागातील ७८ वर्षीय पुरूष, तसेच ४१ वर्षीय पुरूष व दहा वर्षाच्या मुलाला कोरोना झाला आहे. वाळवा तालुक्यातील शिगाव येथील ५२ वर्षीय महिलेस बुधवारी उपचारासाठी दाखल केले होते. गुरूवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा नांदेडहून आला असून, ही महिला स्वत: गावात फिरून भाजीपाला विक्री करत होती.आटपाडी तालुक्यात गुरूवारी सर्वाधिक रूग्ण आढळले असून १६ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. यात बाधिताच्या संपर्कात आलेल्या नेलकरंजी येथील सातजणांचा समावेश आहे. याशिवाय तळेवाडी येथील तीन, अर्जुनवाडी आणि शेटफळे येथे प्रत्येकी दोन आणि हिवतड, तडवळे येथे प्रत्येकी एकास कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. शिराळा तालुक्यातही आठ नवीन रूग्ण सापडले असून यात येळापूर येथील बाधिताच्या संपर्कात आलेले चार, मांगरूळ, गवळेवाडी येथील प्रत्येकी एक आणि बांबरवाडी येथे मुंबईहून आलेल्या पती-पत्नीचा समावेश आहे.