सांगली : कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्क, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी वापरायला हवी, असे आवाहन केले आहे. याप्रकारचे जनप्रबोधनाचे फलक त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केली असून ती लक्षवेधी ठरत आहेत.मराठा क्रांती मोर्चाने आजवर अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहण्याची भूमिका बजावली आहे. महापुराच्या काळातही मराठा क्रांती मोर्चाने मदतकार्यात मोठी भूमिका बजावली होती. आता कोरोनाच्या संकटातही मराठा क्रांती मोर्चाने जनजागर सुरू केला आहे.
यासंदर्भात विविध प्रकारच्या समाजमाध्यमावर त्यांनी जनजागृतीची पत्रके प्रसिद्ध करून जनतेला आवाहन करण्याचे काम सुरू केले आहे. यात शिवरायांच्या नीतीचे एक आवाहन नागरिकांना सर्वात भावले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे, सहा महिने अफजल खान शिवाजी महाराज व मावळ्यांचा जीव घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसला होता. शिवाजी महाराज बाहेर निघण्याची वाट पाहत होता.
शिवाजी महाराज तब्बल ६ महिने गडावर शांत बसले, संयम राखला, योजना आखली व सहा महिन्यांनी नोव्हेंबर १६५९ ला अफजल खानाचा मोठ्या शिताफीने वध केला. मित्रांनो आपण त्याच मातीत जन्मलो आहोत. आज त्याच भूमिकेत आपण आहोत.
शत्रू दाराशी आलेला आहे. तो आपण बाहेर निघण्याची वाट पाहत आहे. परंतु आता परीक्षा आहे आपल्या संयमाची ! आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा... आततायीपणा करू नका. शांत डोक्याने विचार करा व या शत्रूचा पराभव करा. हरायचं की हरवायचं, असा सवाल करीत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची आठवण करून देऊन जनतेमध्ये लढण्याचे साहस निर्माण करण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. या आवाहनाचा परिणाम लोकांवर होताना दिसत आहे. ही पोस्ट व्हायरल होतानाच ती लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. याशिवाय अन्य काही जनप्रबोधनाच्या पोस्टही त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. त्याही लोकांवर प्रभाव टाकत आहेत.