कासेगाव : शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना स्वखर्चाने उकडलेली अंडी देण्यासाठी निघालेल्या जिल्हा बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यास कासेगाव पोलिसांनी अडवून दमदाटी व अर्वाच्च शिवीगाळ केली. तू अंडी दिली नाहीस तर कोरोना झालेले मरतील काय, तुला त्यांचा फारच पुळका आलेला आहे, तुझ्याकडे पैसा जास्त झाला असेल तर आम्हाला दे, अशी भाषा पोलिसांनी वापरली. या घटनेची कासेगाव परिसरात चर्चा सुरू आहे.
कासेगाव येथील अशोक धोंडिराम माने हे शिराळा येथे जिल्हा बँकेत विभागीय अधिकारी आहेत. गतवर्षी त्यांच्या आईचे कोरोनाने निधन झाले. हे दुःख कोणाच्या वाट्यास येऊ नये या हेतूने कोरोनाबाधित रुग्णांना अशोक माने गेल्या दोन महिन्यांपासून उकडलेली अंडी पुरवत आहेत. शिराळा येथे बँकेत कामावर जाताना दररोज घरातूनच ते १०० उकडलेली अंडी घेऊन जातात. रविवारी, दि. २३ रोजी बँकेला सुट्टी असतानाही केवळ अंडी देण्यासाठी ते शिराळा येथे त्यांच्या चारचाकी गाडीतून गेले. परतत असताना वाटेगाव रस्त्यावर कासेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमर जाधव व विजय पाटील यांनी त्यांना अडविले. कागदपत्रे दाखवा म्हटल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रे दाखवली. त्यांनी सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. तुला काय? अंडी द्यायचा ठेका दिला आहे का, तू अंडी दिली नाहीस तर कोरोना झालेले मरतील काय? असे म्हणत अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एकाने गाडीची चावी काढून घेतली. गाडीत बस, नाहीतर मारत पोलीस ठाण्यात नेईन, अशी दमदाटी त्यांनी केली. वैतागून माने यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांना फोन केला. त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आल्यानंतर मात्र त्या दोघांनी माने यांना सोडून दिले. या घटनेनंतर घरी आल्यानंतर माने यांना भोवळ आली व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉक्टरकडे नेले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.
चौकट
‘लोकमत’ने केले होते कौतुक
१८ मे च्या ‘ लोकमत’मध्ये 'तो बनला पौष्टिक अन्नदाता' मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल ‘लोकमत’ने घेतली होती.
चौकट
अमर, अकबर, अँथोनी पुन्हा चर्चेत
कासेगाव पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांचे काम व प्रतिमा चांगली असली तरी काही युवा पोलीस मात्र वेगळेच कारनामे करीत आहेत. अर्थपूर्ण तडजोडी करून प्रकरण मिटविण्यात पोलीस ठाण्यातील अमर, अकबर, अँथोनी पुढे असतात. यातील अमर हा कायम आघाडीवर असतो, तर अकबर व अँथोनी हे त्याला साहाय्य करीत असतात. या कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस प्रमुखांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.