सांगली : कोरोनामध्ये गेल्या वर्षभरापासून आघाडीवर काम करीत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार होत नाही. मार्चचा पगार एप्रिल निम्मा संपला तरीही मिळाला नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. त्यांना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग न्याय देणार की नाही, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा केलेली नाही. वर्षभर कसलीही शासकीय सुटी नाही, रजा नाही. जनतेला सेवा दिली. दोन महिन्यांपूर्वी वेळेवर पगार व्हावेत, याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना पत्र दिले आहे. ते अदखलपात्र ठरले आहे. गुढीपाडव्याचा सण झाला तरीही पगार मिळाला नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांचे हक्काचे पगार वेळेवर करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करणार आहे की नाही, असा सवाल आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केला आहे. आठवड्यात पगार झाले नाही तर कोरोनाच्या संकटात इच्छा नसताना काम थांबवावे लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.