संतोष भिसेसांगली : १०० व्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षांनंतरही कायम आहे. कोरोनाची सध्याची तीव्रता पाहता यावर्षीदेखील संमेलनाची शक्यता नाही. नाट्यपंढरीतील रसिकांचा यामुळे हिरमोड झाला आहे.नाट्य परिषदेच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत नाट्यसंमेलन रहित करण्यावर एकमत झाले होते, पण कोरोनाची पहिली लाट ओसरु लागल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. गेल्यावर्षी ७ मार्चला सांगलीत उदघाटन आणि त्यानंतर राज्यभरात १० ठिकाणी संमेलने अशी रुपरेषा आखण्यात आली होती. तंजावर, सांगली. कोल्हापूर असा प्रवास करीत मुंबईत समाप्तीचे नियोजन होते.
पण १४ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्याने रंगाचा बेरंग झाला, तो अजूनही पूर्ववत झालेला नाही. संमेलनासाठी शासनाने अंदाजपत्रकात १० कोटींची तरतूद केली आहे, पण कोरोनामुळे सरकारी तिजोरीवर पडलेला भार पाहता हा निधी मिळण्याची शक्यताही कमी आहे.मार्चपासूनचे सर्व कार्यक्रम स्थगित झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत तशीच स्थिती राहीली. दिवाळीत नाट्यपरिषदेच्या नियामक समितीच्या बैठकीत संमेलन तुर्त स्थगित करण्यावर सदस्यांचे एकमत झाले. लॉकडाऊन संपून नाट्यप्रवाह पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर विचार व्हावा असे सुचविण्यात आले. तशी स्थिती दीड वर्षानंतरही निर्माण झालेली नाही.
पहिली लाट ओसरल्यानंतर नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेने परवानगी मिळाली होती, त्यावेळीही संमेलनाच्या संकल्पनेने उचल खाल्ली, पण पुन्हा दुसरी लाट सुरु झाल्याने ती गुंडाळून ठेवावी लागली.सांगलीत यापूर्वी पाच नाट्यसंमेलने झाली आहेत, पण १०० व्या संमेलनाची साऱ्यांनाच उत्सुकता होती. जिल्ह्यातील नाट्य परिषदांच्या सर्व शाखांचा त्यात सक्रिय सहभाग होता.साडेनव्याण्णववे संमेलन झालेदेखील!१०० वे नाट्यसंमेलन प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसत नसल्याने काही ज्येष्ठ रंगकर्मींनी मुंबईत साडेनव्याण्णववे संमेलन उरकून घेतले. मुलुंडमध्ये मर्यादीत संख्येने कलाकार व रसिकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला. मात्र त्यानंतरही १०० व्या संमेलनाची तिसरी घंटा वाजलीच नाही.
सर्व व्यवहार पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतरच १०० वे नाट्यसंमनेलन होईल. भविष्यात आता कधीही संमेलन झाले तरी ती शंभरावेच असेल, त्यामुळे ते उत्सवी पद्धतीने व राज्यभरात साजरे केले जाईल. तुर्त वाट पाहण्याशिवाय पर्याया नाही.- मुकुंद पटवर्धन,सांगली नाट्यपरिषद.