लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील ३६ वर्षीय गरोदर महिला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. मात्र तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला मिरज येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी घेऊन जात असताना आष्ट्याजवळ रुग्णवाहिकेतच ती प्रसूत झाली.
आरोग्यसेविका एस. एस. माने, सारिका कांबळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णवाहिकेत सुरक्षित प्रसूती करून त्या महिलेचा व बाळाचा जीव वाचविला. हा प्रकार बूधवारी (दि. २) घडला.
मांगले येथील महिला प्रसूतीसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झाली होती. तिची प्रसूतिपूर्व कोरोना चाचणी करण्यात आली. ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रसूतीसाठी तिला कोरोनाग्रस्त गरोदर स्त्रियांसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षात दाखल करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे, डॉ. जयसिंग पवार यांनी घेतला.
त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून तिला मिरज येथे नेण्यात येत असताना आष्टा-सांगली दरम्यान महिलेस प्रसूतिवेदना सुरू झाल्या. त्यावेळी सोबत असणाऱ्या माने व कांबळे या दोन आरोग्यसेविकांनी प्रसंगावधान राखून व स्वतःचा जीव धोक्यात घालून तिची रुग्णवाहिकेच सुखरूप प्रसूती केली. त्या महिलेस मुलगा झाला. त्यांना सुखरूप मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रुग्णवाहिकेत प्रसूतीवेळी शुश्रूषा करण्याचे पूर्ण किट घेतले असल्याने त्याचा वापर करण्यात आला.