नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने यापुढे कोरोनाबाधित रुग्णांना सक्तीने येथील विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच छाया रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कासेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते व सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार उपस्थित होते.
सध्या याठिकाणी १५ बेडचा विलगीकरण कक्ष सुरु आहे. आणखी रुग्णांची सोय करण्यासाठी हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची तसेच बाधित रुग्णांच्या घरातील व संपर्कातील व्यक्तींची अॅन्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे. गावातील एकूण रुग्णसंख्या २५३ आहे तर सध्या ६०हून अधिक रुग्ण उपचाराखाली आहेत. विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी नाष्टा, चहा, जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील हे सदस्य शरद बल्लाळ यांच्या वाढदिवसानिमित्त २० दिवस करणार आहेत.
या बैठकीला ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, तलाठी पंडित चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे, माजी सरपंच संभाजी पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य माणिक पाटील, महेश पाटील, कृष्णाजी माने, पोलीस पाटील, अतुल बनसोडे, धनंजय पाटील, सतीशकाका पाटील, विवेक शहा, आदी उपस्थित होते.