सांगली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोना दहशतीमुळे जनमानसात भीती निर्माण झाली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, आजाराची भीती, समज-गैरसमजांमुळे मानसिक आजारपण वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘विश्वास... कोरोनासोबत जगण्याचा..! ’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांच्या मनावरही परिणाम होत आहे. यातून व्यसनाधिनता, कौटुंबिक वाद-विवाद वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाविषयी अकारण भीती कमी व्हावी, या हेतूने जिल्हा प्रशासनाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना याचा उपयोग होईल. या उपक्रम यशस्वी करण्यासाठी तज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था काम करणार आहे. मनोमित्र हेल्पलाईन नंबर असून, या योजनेंतर्गत रुग्णांचे चिंता, उदासिनता, ताणतणाव अशा विविध मानसिक त्रासांचे निदान करून तज्ञ मोफत समुपदेशन सेवा देणार आहेत. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.