सोलापूर : कोरोना महामारीमुळे दिवसेंदिवस मृत्यूंची संख्या वाढत आहे. या मृतांचे अंत्यसंस्कारही नियमानुसार प्लॅस्टिकच्या लांब पिशवीत बांधून केले जातात. त्यामुळेे पारंपरिक पध्दतीने मृतदेहाला अखेरचा सन्मानही देता येत नाही. शिवाय कैलासरथातूनही स्मशानातून नेता येत नाही. त्यामुळे बहुतांश कैलास रथ जागेवर थांबूनच आहेत.
सामान्य स्थितीत कैलास रथांची मागणी कमी असणं, ही बाब उत्तम आहे; पण एकीकडे मृतांची संख्या वाढत असताना दुर्दवाने नातेवाईकांना साधं कैलासरथातूनही मृतांना स्मशानात नेता येत नाही. कोरोनामुळे कैलास रथाची मागणी ५० टक्क्यांनी घटली आहे, असे रथ चालकांनी सांगितले. सोलापुरात एकूण १२ ते १३ खासगी कैलास रथ चालक आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहास अंतिम संस्कारासाठी शववाहिकांद्वारे घेऊन जातात, असेही त्याने सांगितले.
तसा सन्मानही नाही!
पूर्वी एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर प्रत्येक धर्मानुसार त्या त्या पध्दतीने अंत्यसंस्कार केले जातात. मृत व्यक्तीच्या घरापासून स्मशानापर्यंतम जाण्यासाठी कैलास रथास फुलाची आरास करत, रथाच्या समोर भजनही असे. हलगीनाद असायचा; पण कोरोना मृतांना हा सन्मान मिळत नाही.
गेल्या अठरा वर्षांपासून कैलास रथाची सेवा देत आहे, मात्र मागणी घटली आहे, पूर्वी दिवसागणिक दोन-तीन ऑर्डर मिळायच्या मात्र सध्या तेही मिळेनात, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- दत्तात्रय आवार - कैलास रथ चालक