लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गृह विलगीकरणात असतानाही कोरोनाचा प्रसाद वाटत फिरणाऱ्या अनेक रुग्णांमुळे सध्या संसर्ग वाढत आहे. गुरुवारी सांगली, मिरज शहरांसह ठिकठिकाणी असे रुग्ण फिरताना आढळून आले. त्यामुळे यांना आवरणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गेले महिनाभर कोरोना रुग्ण वाढत आहेत. संसर्ग वाढत असल्याने तो रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर उपाययोजनाही सुरू आहेत. मात्र, या सर्व प्रयत्नांवर पाणी टाकण्याचे काम सध्या गृह विलगीकरणातील रुग्ण करीत आहेत. त्यांच्यावर प्रत्यक्ष वॉच नसल्याने ते बिनधास्त फिरत आहेत. गावात, बाजारात भटकंती करून ते कोरोनाचा प्रसाद वाटत आहेत. गुरुवारी दिवसभरात सांगली, मिरज परिसरातील अशा रुग्णांनी भटकंती केल्याचे दिसून आले.
गृह विलगीकरणातील या कोरोना प्रसारकांना रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. वेळीच पावले उचलली नाहीत, तर कोरोनाचा कहर जिल्ह्यास अनुभवास येऊ शकतो.
जिल्ह्यातील आकडेवारी
एकूण रुग्ण ५०१६२
बरे झालेलेे ४७१६१
उपचार सुरू असलेले १२२३
गृह विलगीकरणातील ९९३
चौकट
मिरजेतील गृह विलगीकरणातील एक जण लक्ष्मी मार्केटमध्ये फिरताना दिसून आला. ओळखीच्या मित्रांनाही भेटला. त्यानंतर दुचाकीवरून तो गांधी चौकापर्यंत जाऊन पंढरपूर रोडवरील त्याच्या घरात परतला. यादरम्यान त्याने अनेकदा मास्कही हनुवटीवर घेतला होता. त्यामुळे कोरोनाचा तो वाहक बनल्याचे दिसत होते.
चाैकट
तक्रारीनंतर केले ॲडमिट
जिल्ह्यात काही ठिकाणांहून आरोग्य विभागाला गृह विलगीकरणातील लोक फिरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने विटा, पलूस, जत व मिरज तालुक्यांतील संबंधित कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना ॲडमिट केले.
चौकट
यांना आवरणार तरी कोण?
जिल्ह्याच्या सीमेवर, रेल्वे व बसस्थानकावर कोठेही तपासणी केली जात नाही. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यात गृह विलगीकरण केलेले रुग्णही सांगलीत सहज प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अशा कोरोना प्रसारकांना आवरणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.