सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपमधून फुटून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणाऱ्या सहा नगरसेवकांविरोधात गुरुवारी अपात्रतेसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. मात्र, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अपात्रतेच्या प्रस्तावावर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता धूसर आहे.
फेब्रुवारीत झालेल्या महापौर, उपमहापौर निवडीवेळी सत्ताधारी भाजपमधून सात नगरसेवक फुटले. त्यातील पाचजणांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला मतदान केले, तर दोघेजण गैरहजर राहिले. त्यात भाजपचे महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीमा नाईक यांनी उघडपणे मतदान केले होते, तर भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक विजय घाडगे यांनीही आघाडीला मदत केली. माजी उपमहापौर आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे अनुपस्थित राहिले. त्यामुळे बहुमत असतानाही भाजपचा पराभव झाला.
यापैकी घाडगेवगळता सहा नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी भाजप आक्रमक झाला आहे. शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर व सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी उच्च न्यायालयातील वकिलांशी चर्चा करून या सहाजणांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजाविली होती. तिला नगरसेवकांनी उत्तरही दिले आहे पण हा खुलासा भाजपने फेटाळून लावत आता विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. ऑनलाईन मतदान प्रक्रियेची सीडी पुराव्यांदाखल मिळविली आहे. गुरुवारी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल होणार आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचा अहवाल मंगळवारी पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही चाचणी करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्यासोबत असलेले अनेक अधिकारी विलगीकरणात आहेत. त्यामुळे गुरुवारी प्रस्ताव दाखल झाला तरी त्यावर लवकरच सुनावणी होईल, अशी शक्यता कमी आहे.