खंडेराजुरी (ता. मिरज) येथे कोरोनामुक्त लहान मुलांचा फुगे, फळे यासह पौष्टिक आहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच गजानन रुकडे, पोलीस पाटील तानाजी पाटील, रवी हजारे आदी उपस्थित होते.
मालगाव : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील विलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांचे आपत्ती व्यवस्थापन समितीने फुले, फुगे देऊन सत्कार केला, तसेच प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गूळ, शेंगा, अंडी, फळे देऊन त्यांचा आनंद पुन्हा द्विगुणित करीत त्यांना सन्मानपूर्वक घरी सोडण्यात आले.
खंडेराजुरी आरोग्य केंद्रातील रहिवासी इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू आहे. कक्षात सहा लहान मुलांसह २५ कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होते. यापैकी सहाही मुलांनी योग्य उपचारांमुळे कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झालेल्या या मुलांना सोमवारी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सरपंच गजानन रुकडे, पोलीस पाटील तानाजी पाटील, डॉ. सुहास शिंदे, वास्कर शिंदे, दिनकर भोसले, सुभाष चिंचकर यांच्या उपस्थितीत फुगे, फुले देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. पौस्टिक आहारासाठी ग्रामीण भागात प्रसिद्ध असणाऱ्या हजारे सेल्स काॅर्पोरेशनकडून कोरोनामुक्त झालेल्या मुलांबरोबर इतर रुग्णांना गूळ, शेंगांचे वाटप करण्यात आले.
सुभाष चिंचकर यांच्याकडून रुग्णांना दररोज अंडी व केळी वाटप केले जात आहे. यावेळी वास्कर शिंदे, संजय चव्हाण, दिनकर भोसले, सुभाष चिंचकर, पवन कांबळे, संतोष रिसवडे, बाबू चौगुले, आरोग्य सहायक गुंडा कुंभार, रवी हजारे, अमित पवार, संपत पाटील, संजय माने, आली मुजावर उपस्थित होते.
चौकट
चांगल्या सोयीमुळे रुग्णसंख्या अटोक्यात
विलगीकरण कक्षातील लहान मुलांसह इतर रुग्णांना योग्य आहार देऊन चांगली काळजी घेतल्याने रुग्ण बरे होत आहेत. पर्यायाने गावात रुग्णसंख्याही आटोक्यात आल्याचे सरपंच गजानन रुकडे यांनी सांगितले.
चौकट
लहान मुलांना योग्य आहाराची गरज
लहान मुलांना औषध देऊन त्यांच्या शरीरावर परिणाम करण्यापेक्षा पालकांनी लहान मुलांना गूळ, शेंगा, तूप, दूध, तीन वेळा योग्य जेवण, पूर्ण वेळ झोप, असा समतोल आहार दिल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे, तसेच लहान मुलांचा कोरोनापासून बचाव होण्यास मदत होईल, असे डॉ. सुहास शिंदे म्हणाले.