तासगाव : तासगाव एसटी आगाराच्या कार्यालयात बसून आक्षेपार्ह डायलॉग वापरून टिकटॉक व्हिडीओ बनविणे मीना पाटील या वाहतूक निरीक्षकांना महागात पडले आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याची दखल घेऊन विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी मीना पाटील यांना निलंबित केले आहे. शिवाय त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे, अशी माहिती ताम्हणकर यांनी दिली.मीना पाटील येथील एसटी आगारात वाहतूक निरीक्षक आहेत. एकीकडे कोरोनाच्या गडद संकटात तासगाव आगाराचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र दुसरीकडे मीना पाटील यांनी चक्क आगाराच्या कार्यालयात काही टिकटॉक व्हिडीओ बनविले. हे व्हिडीओ चांगलेच ह्यव्हायरलह्ण झाले. मात्र चक्क कार्यालयात आणि तेही कामाच्या वेळेत आॅन ड्युटी असताना असे व्हिडीओ केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली.यातील काही व्हिडीओ, त्यातील हावभाव, तसेच व्हिडिओ बनवताना बॅकग्राऊंडला दिलेले आक्षेपार्ह संवाद यामुळे मीना पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली.
वर्दी दाखवून आक्षेपार्ह डायलॉग वापरत केलेला व्हिडीओ असो किंवा हातात पेन घेऊन सिगारेट ओढत असल्याचा हावभाव करणारा व्हिडीओ असो, अशा व्हिडीओमुळे एसटी महामंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली.विभाग नियंत्रक ताम्हणकर यांनीही याची गंभीर दखल घेत पाटील यांना निलंबित केले आहे. शिवाय त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरू केली आहे. तासगावसह तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा होती.