सांगली : गेल्या दोन महिन्यापासून शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय बंद ठेवून सहकार्य केले आहे. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने हातगाड्यांना परवानगी द्यावी अथवा इन्स्टिट्युट क्वारंटाईन करून खाण्या-पिण्याचा खर्चाची जबाबदारी उचलावी, अशी मागणी सोमवारी विक्रेत्यांच्या बैठकीत करण्यात आली.येथील छत्रपती शिवाजी भाजी मंडईत हातगाडी, भाजीपाला, फास्टफुड व किरकोळ विक्रेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पृथ्वीराज पवार, नगरसेविका स्वाती शिंदे, सुरेश टेंगले, चंद्रकांत सूर्यवंशी, रेखा पाटील यांच्यासह विक्रेते उपस्थित होते. शहरात पाच हजार नोंदणीकृत फेरीवाले आहेत.
गेली दोन अडीच फेरीवाल्याने लॉकडाउन पाळला आहे. शहरातील दुकानदार व व्यापारी संघटनांनी शासनाच्या निर्णयास आव्हान दिल्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. पण हातगाड्याबाबत शासनाने काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पाच हजार कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाने अटी शर्तीनुसार हातगाडे सुरू करण्यास परवागनी द्यावी. ही परवानगी न मिळाल्यास पुढील आठवड्यात सर्व हातगाडी, फेरीवाले महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होऊ. सर्वांना प्रशासनाने संस्था क्वारंटाईन करून त्यांच्या खाण्या-पिण्याची, मुलांच्या शिक्षण व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.