सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसांत तब्बल आठने वाढ झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आष्टा येथील झोळंबी वसाहत, शिराळा तालुक्यातील मोरेगाव, तर आटपाडी तालुक्यातील जांभुळणी व नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील चारजण कोरोनाबाधित झाले होते, तर रविवारी आणखी चारजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नांगोळेतील बाधिताचा मुलगा, बनपुरी (ता. आटपाडी), खिरवडे (ता. शिराळा) व मुंबईतील धारावी येथून मालगाव (ता. मिरज) येथे आलेल्या वृध्देचा समावेश आहे.मुंबईहून विटा येथे आलेल्या ७२ वर्षीय वृध्दाचा मिरजेत उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. कोरोना संशयावरून त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात रविवारी रात्री त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार झोळंबी वसाहत, आष्टा येथील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुंबईहून कुटुंबासह ही व्यक्ती आष्टा येथे आली होती. त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर मिरजेत दाखल करण्यात आले होते. २१ मे रोजी मुंबईहून नांगोळे येथे आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याच्या २२ वर्षीय मुलाचाही अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे.
शिराळा तालुक्यातील मोरेगाव येथील तसेच जांभुळणी (ता. आटपाडी) येथील व्यक्तीचाही अहवाल शनिवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आला होता. रविवारी आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे मुंबईहून आलेल्या १५ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिराळा तालुक्यातील खिरवडे येथे मुंबईहून आलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीही कोरोनाबाधित झाली आहे.मिरज तालुक्यातील मालगाव येथे धारावीतून आलेल्या ७५ वर्षांच्या वृध्देलाही कोरोना निदान झाले आहे. शनिवारी मुंबईतील धारावी येथून बसने २२ जण आले होते. त्याची माहिती मिळताच प्रशासनाने या सर्वांना तातडीने क्वारंटाईन करत त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील २० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर वृध्देचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एक अहवाल प्रलंबित आहे.
दरम्यान, सध्या उपचार घेत असलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८२ झाली असून, यातील ३४ जणांवर मिरजेत उपचार सुरू आहेत, तर ४६ जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.भिकवडी, अंकलेचे कोरोनामुक्तजिल्ह्यातील भिकवडी खुर्द (ता. कडेगाव) येथील दोघेजण यांच्यासह अंकले (ता. जत) येथील एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिघेजण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनातून बचावला, क्षयरोगाने मृत्यूशहरातील साखर कारखाना परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर येथील कोरोनामुक्त रुग्णाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. कोरोनाचे निदान झाल्याने त्याच्यावर मिरज कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असला तरी, त्यास फफ्फुसाचा क्षयरोग असल्याने त्याच्यावर तिथेच व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. कोरोनातून मुक्त झाला असला तरी त्याला क्षयरोग असल्याने तिथेच उपचार सुरू होते. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.