संजयनगर : सांगलीत अभयनगर येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य संघटनेच्या कक्षेतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पथकाने प्रभाग ९ व १८ मधील ८० रुग्णांची तपासणी करून रक्ताचे नमुने घेतले.
तपासणीसाठी ते नमुने चेन्नई येथे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च संस्थेकडे पाठवित असल्याची महिती भारतीय पथकातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आदित्य बेंगले व डॉ. संजीवनी घाडगे यांनी दिली.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) या संस्थेतर्फे भारतीय समुदायातील कोरोना विषाणूचा प्रसाराच्या कक्षा समजून घेण्याच्या हेतूने सर्वेक्षण सुरू आहे. परिषदेच्या दहा तज्ज्ञांचे पथक सांगलीतील महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र, अभयनगर येथे दाखल झाले असून, प्रभाग ९ व १८ मधील ८० नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत.
सांगली जिल्ह्यातील ४०० नागरिकांच्या रक्ताचे नमुने अभ्यासासाठी पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, मनगू सरगर, सचिन सरगर उपस्थित होते.