अविनाश कोळी सांगली : कोरोनाच्या महामारीचे काटे एकीकडे टोचत असले तरी, डिजिटल क्रांतीचा बहरही त्यामुळे फुलला आहे. ई-लर्निंग, वर्क फ्रॉम होम, प्रत्येक क्षेत्रात डिजिटलचा वाढलेला वापर यामुळे स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि टॅबच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात सांगली जिल्ह्यात सुमारे १० कोटींची उलाढाल झाली आहे. यात केवळ मोबाईलची उलाढाल सुमारे सात कोटीची आहे.जिल्ह्यातील विविध मोबाईल, संगणक व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मागणीच्या तुलनेत मालाचा पुरवठा घटला आहे. गेल्या अडीच महिन्यात सर्वच क्षेत्रांचे स्वरूप बदलल्याचे दिसत आहे. छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी डिजिटल व्यवहारांना पसंती दिली आहे.
कोरोनाच्या काळात डिजिटल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. खासगी क्लासेस, शाळा, विविध स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम, चर्चासत्रे अशा अनेक गोष्टींनी डिजिटल आवरण धारण केले आहे. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप व अनुषंगिक गोष्टींना मागणी वाढली आहे.
जिल्ह्यात सुमारे ३५० मोबाईल, संगणक विक्रेते असून महापालिका क्षेत्रातच जवळपास दीडशेच्या घरात व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे मोबाईल व लॅपटॉप खरेदीसाठी गर्दी होत आहे. पंधरा दिवसात मोबाईलची सुमारे सात कोटीची उलाढाल झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातील डिजिटलचा वापर भविष्यातही वाढणार असल्याने, मोबाईल, टॅब, लॅपटॉपची मागणी वाढत जाणार असल्याचे जिल्ह्यातील व्यावसायिकांचे मत आहे.