सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. पण काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ फासला जात आहे. सकाळ होताच काही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यात उत्साही तरुणांचाही समावेश आहे. अजूनही या नागरिकांना कोरोनाच्या गंभीरतेची जाणीव झालेली दिसत नाही.कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या आजारावर अद्यापही औषध अथवा लस शोधण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे, हाच सध्याच्या घडीला त्यावरील उपाय आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे २५ रुग्ण सापडले आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या एकही रुग्ण नसला तरी, जवळपास तीनशे जणांना होम क्वारंटाईन केले आहे. महापालिकेने किराणा, भाजीपाला, दूध घरपोच करण्याचे नियोजनही केले आहे. तरीही बहुतांश सांगलीकर सकाळच्या टप्प्यात खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत.गावठाणमधील गल्ली-बोळात आणि उपनगरांमध्ये काही किराणा दुकानांसमोर सर्कल तयार करून सुरक्षित अंतर ठेवले जात आहे, तर काही दुकानात या नियमाला हरताळ फासला जात आहे. तीच अवस्था भाजीपाला खरेदीच्यावेळी होत आहे. एकाच ठिकाणी तीन ते चार भाजीपाला विक्रेते एकत्र येत आहेत. तिथे एकाचवेळी नागरिकांची अधिक गर्दी होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात नाही.
उपनगरे, झोपडपट्टी आणि छोट्या गल्ली-बोळांमध्ये नागरिक घराबाहेर एकत्रित गप्पा मारताना आणि रस्त्यावरून फिरताना दिसून येतात. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या जात असल्या तरी, नागरिकांनी मात्र ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत.