सांगली : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या व्यक्तींना त्यांच्या गावी जाण्यासाठी व परजिल्ह्यात,परराज्यात अडकून पडलेल्यांना जिल्ह्यात येण्यासाठी प्रशासनाने परवानगी देण्यास सुरूवात केली आहे.
बुधवारपर्यंत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात व राज्यात ७५ हजार २२३ व्यक्ती गेल्या असून राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून ३५ हजार ५७१ व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.लॉकडाऊनच्या शिथीलतेनंतर वाहतूकीस व प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाकडे रितसर परवानगी मिळवून जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी प्रक्रीया राबविण्यात येत आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या २९ हजार ६५० व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या ४५ हजार ५७३ व्यक्तींचा समावेश आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या ८ हजार ६९२ तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या २६ हजार ८६९ व्यक्तींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.