सांगली : लॉकडाऊन संपताच केस कापायला पळण्याच्या तयारीत असाल, तर जरा खिशाचा सल्ला घ्यावा लागेल. नाभिक संघटनेने केशकर्तनाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दाढीसाठी दुप्पट, तर क टिंगसाठी तिप्पट पैसे मोजावे लागतील. सांगलीत याची तात्काळ अंमलबजावणी होणार नसली तरी, लॉकडाऊन पूर्ण संपताच ही दरवाढ लागू होईल, असे संघटनेने सांगितले.कोरोना महामारीत ग्राहकांना सेवा देण्यासाठी खर्चिक सुरक्षा साधने वापरावी लागत असल्याने दरवाढ करावी लागल्याची माहिती संत सेना महाराज नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष संतोष खंडागळे यांनी दिली. राज्य संघटनेने दरवाढीची सूचना केली आहे, पण सांगलीत अद्याप अंमलबजावणी केली नसल्याचे ते म्हणाले.केसांसोबत खिशालाही कात्रीकटिंगसाठी ६० ते ८० वरून १०० ते १२० रुपये, दाढीसाठी ४० ते ५० ऐवजी ६० ते ८० रुपये मोजावे लागतील. अन्य सेवांचे दरही या तुलनेने वाढतील. ही दरवाढ थेट ५० टक्क्यांची आहे.ग्राहकाला सेवा देताना नाभिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नसते. त्यामुळे सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी लागते. पीपीई कीटसह अन्य साहित्य खरेदी करावे लागणार असल्याने सलून साधनांच्या खर्चात वाढ होणार आहे. अनेक दुकाने भाड्याच्या गाळ्यात असल्याने त्याचाही आर्थिक भार आहे. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.चोरटी सेवा दिल्यास पोलिसांना कळविणारखंडागळे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात काही व्यावसायिक दुकानात चोरून सेवा देत असल्याचे आढळले आहे. अनेकांनी घरोघरी जाऊनही काम केले आहे. यामध्ये कोरोनाविषयक सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा व्यावसायिकांची माहिती संघटनेतर्फे पोलिसांना देणार आहोत.
सलून व्यवसाय करताना सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्यांचे पालन करताना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. पीपीई कीट, मास्क किंवा फेसशिल्ड वापरावी लागेल. प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र टॉवेल, खुर्चीसह हत्यारांचे निर्जंतुकीकरण, दुकानात एकावेळी जास्त ग्राहकांना निर्बंध यामुळे व्यवसायाचा भांडवली खर्च वाढला आहे. लॉकडाऊन संपले तरी आणखी किमान सहा-सात महिने तरी भीती कायम राहील. त्यामुळे सुरक्षेची साधने कायम राहतील. सांगलीत तूर्त दरवाढ केलेली नाही. पण दुकाने पुन्हा सुरु झाल्यानंतर ती लागू होईल.- संतोष खंडागळे, संत सेना महाराज नाभिक संघटना, सांगली