सांगली : परजिल्ह्यांतून व परराज्यांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. बाहेरून येणाऱ्यांचे जिल्ह्यात स्वागतच असले तरी, त्यांनी रितसर आपली तपासणी करून घेऊन यावे. तसेच क्वारंटाईनचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तरीही अनेकजण त्याचे पालन करत नाहीत.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याने, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असली तरी, यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाने आपली तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शिवाय होम क्वारंटाईनचे पालन करावे. क्वारंटाईनचे जे पालन करणार नाहीत, त्यांना थेट इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस अधिक आव्हानात्मक असल्याने, गरज असेल तरच बाहेर पडा. तसेच मास्कचा वापर, वारंवार हात धुण्यासह नियमांचे पालन करावे.राज्य शासनाच्या निर्देशानुसार उद्या, शुक्रवारपासून लॉकडाऊनमध्येही काही बदल होत आहेत. यापूर्वी रेड,आॅरेंज, ग्रीन असे तीन झोन होते, आता दोनच झोन असणार आहेत. त्यात सांगलीचा नॉनरेड झोनमध्ये समावेश आहे. सध्या बंद असलेली दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय जिल्हांतर्गत बससेवाही सुरू करण्यात येणार आहे. बससेवा सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असणार आहे.तसेच खुल्या मैदानावर गर्दी न करता व्यायाम करण्यास परवानगी असणार आहे. विवाहास ५० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधीलाही ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.पान दुकाने सुरू, पण पार्सल सेवाचजिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शुक्रवारपासून जिल्ह्यातील पान दुकाने सुरू करण्यासही परवानगी असेल. मात्र, केवळ पार्सल सेवाच पुरविण्याची असून, ग्राहक जर तिथेच पान खाऊन थुंकल्याचे निदर्शनास आले, तर दुकान बंद करण्याची कारवाई करण्याबरोबरच त्या व्यक्तीलाही ५०० रूपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे पान दुकानदारांनी केवळ पार्सल सेवा पुरवावी.परस्पर निर्णय नकोतअनेक गावात परस्पर गावातील रस्ते बंद करण्यासह लॉकडाऊन पाळण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे असून यामुळे अडवणूक होत आहे. असे परस्पर निर्णय घेणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.