सांगली : गेली दोन महिने कोरोनाच्या परिस्थितीत अहोरात्र स्वच्छता आणि कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या सांगली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करीत टाळ्या वाजवत नागरिकांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केला. गाव भागातील नागरिकांच्या या आदरतिथ्याने स्वच्छता कर्मचारी मात्र भारावून गेले.सांगली महापालिकेचे स्वच्छता योध्दा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्मृती पाटील, राजेंद्र तेली, आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे, डॉ. संजय कवठेकर यांच्या नियोजनानुसार गेली 2 महिने कोणतीही सुट्टी न घेता अहोरात्र काम करत आहेत.
सांगलीच्या गावभागात दररोज कचरा गोळा करण्याचे काम हे कर्मचारी करत आहेत. त्यामुळे या कर्मचार्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी गावभागातील आनंदसागर अपार्टमेंटमधील नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण करीत त्यांना सत्कार केला.
या कोरोनाच्या महामारीत कचरा गोळा करणाऱ्या या आरोग्य योद्धांचा सन्मान करीत नागरिकांनी सुद्धा त्यांचे आत्मबल वाढविले. या नागरिकांच्या आदरतिथ्याने स्वच्छता कर्मचारी मात्र भारावून गेले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन आनंद सागर अपार्टमेंटमधील नागरिक अस्मिता केळकर, जेष्ठ नागरिक शशिकांत केळकर, हेमंत आपटे, मुक्ता केळकर, स्थानिक नगरसेवक युवराज बावडेकर, अशोक मानकापुरे , जंबु राजोबा, यश राजोबा, संगीता राजोबा, संजय सुंजे आदींनी केले होते.
यावेळी या सर्व स्वच्छता योद्धांचा सॅनिटायझर, ग्लॉज, मास्क देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक बाबासाहेब सिसाळे, मुकादम रमेश मद्रासी , अमित सावंत, धीरज मोरे आदी उपस्थित होते.